माझ्याबद्दल थोडेसे
माझी खरी ओळख म्हणाल तर, मी प्रकाश विठ्ठल इनामदार, कै. अप्पासाहेब इनामदार ह्यांचा मुलगा. माझा जन्म पुण्याचा. वडील कै.अप्पासाहेब इनामदरांकडून कलेचा वारसा मिळाला आणि गेली ४५-५० वर्ष मी निष्ठेने तो जपला.
रंगभूमीवर सर्व कलाकार येतात आणि मी रंगभूमीवर पडलो. माझं पहिलं नाटक भरत नाट्य मंदिर निर्मित झाशीची राणी, माझी भूमिका होती झाशीच्या राणीचा दत्तक पुत्र दामोदर. माझा Role आधीच बसला होता कारण मला फक्त त्या झोळीत बसून सगळ्यांकडे टकमक बघायचं होत. प्रकाश इनामदार वय वर्ष १ वजन ३१ पौंड गुटगुटीत असा मी. आणि वडील स्वतः नाटकात असल्यामुळे बाळाची काहीच चिंता नव्हती चिंता होती ती माझ्या वजनाची. मला पाठूंगळी घेऊन झाशीच्या राणीने तालीम केली नव्हती. आणि जशी ती रंगभूमीवर आली तशी झोळी माझ्या वजनाने फाटली आणि मी रंगभूमीवर पडलो. रंगमंदिरात हशा पिकला आणि माझा सर्वांना हसवण्याचा प्रवास सुरु झाला. रंगभूमीला माझ्या रूपानी एक वजनदार कलाकार मिळाला.
नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, मालिका, CD's ह्यांसारख्या क्षेत्रातला प्रवास आजपर्येंत केला. कधी मनमुराद हसायला लाऊन, कधी कोपरखळ्या मारून, कधी भावनांना हात घालून रसिकांच्या मनोरंजनाचा वसा पुढे चालवला. १९८० साली वडिलांच्या निधनानंतर कलासंगम हि संस्था पुढे चालू ठेऊन अनेक नाटकांची निर्मिती माझ्या हातून झाली. 'गाढवाचं लग्न' हा माझ्या आयुष्याच्या प्रवासातला एक MileStone म्हटलात तरी चालेल. अनेक गौरव आणि सन्मान ह्याच गाढवाने मला मिळवून दिले आहेत. लोकनाट्य, वगनाट्य, सामाजिक नाटक, ऐतिहासिक नाटक, संगीत नाटक, द्विपात्री अश्या अनेक माध्यमातून मला रंगभूमीची सेवा करायला मिळाली.अनेक नामवंत, दिग्गज रंगकर्मीन बरोबर काम करण्याची संधी मिळाली.
लोकनाट्यातला सोंगाड्या असो, संगीत नाटकातला कविराज असो किंवा सामाजिक नाटकातला रावसाहेब असो सर्वच भूमिका मी मनापासून जगलो. पण एक भूमिका माझा आत्मा बनली ती म्हणजे 'सावळ्या कुंभार'. जनसामान्यात मिसळून त्यांच्यातलाच एक होण्याचा भाग्य ह्या सावळ्यानि मला दिलं. रसिकांच्या प्रेमाचा वर्षाव सदैव माझ्यावर झाला आणि रसिक मायबापांची दादचं माझं Tonic बनून गेलं.
जसा मी एक हाडाचा अभिनेता आहे तसाच मी उत्तम खवय्या, उत्तम लेखक, उत्तम शिक्षक आणि एक उत्तम रसिकपण आहे.